पुणे : पुणे पोलिसांनी सोमवारी अचानक नाकाबंदी करुन कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड जप्त करण्यात आला. नाकाबंदीत सव्वा चार हजार वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ३७१ वाहने जप्त करण्यात आली.
पुणे पोलिसांनी सोमवारी दुपारनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी सुरू केली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहर, तसेच उपनगरातील प्रमुख चौकात वाहनांची तपासणी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक, ट्रिपल सीट, मोटार चालवितना आसनपट्टा न लावणे, मोबाइलवर संभाषण अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या १५१८ वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १३ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्यात आली. पाेलिसांनी ३७१ वाहने जप्त केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ३९ पोलीस ठाण्यातील अधिकारी, १८७२ पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.