पुणे : ‘नेतृत्व करताना सहकाऱ्यांना मोठे होऊ द्यायचे नाही, अशी वृत्ती असते. अशी व्यक्ती स्वत: मोठी होते. पण, अशा व्यक्तीची नोंद इतिहासात घेतली जात नाही,’ असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी फडणवीस बोलत होते. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, ॲड. एस. के. जैन यांची पत्नी पुष्पा जैन, तसेच सत्कार समितीचे संयोजक उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश पांडे, गजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

‘आपला वारसा टिकवण्यासाठी सहकाऱ्यांना मोठे केले पाहिजे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. शेवटी सहकारी आपला वारसा टिकवतात. ही बाब दुर्देवाने नेतृत्व करणाऱ्याच्या लक्षात येत नाही. कारण, नेतृत्वात असुरक्षितता असते. दुसऱ्याला मोठे होऊ द्यायचे नाही, अशी वृत्ती अनेकांची असते. असे नेतृत्व स्वत: मोठे होते. पण, इतिहासात अशा नेतृत्वाची नोंद घेतली जात नाही,’ असे फडणवीस यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘नेतृत्व सर्वसमावेशक असायला हवे. ॲड. एस. के. जैन यांनी वकिली क्षेत्रात अनेकांना घडवले. वकिलीबरोबरच शिक्षण, आरोग्य अशा कामांत ते सक्रिय आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांनी कोणतेही शुल्क न आकारता अनेकांची बाजू न्यायालयात मांडली. संघ संस्कारांत वाढलेले ॲड. जैन यांनी विश्वस्त भावनेने अनेकांना घडविले. विश्वस्त कधीच मालक नसतो, याची जाणीव ठेवली. सहकाऱ्यांना मोठे करायचा प्रयत्न त्यांनी केला.’

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत अनेक कार्यकर्ते घडले. हा सत्कार संघ स्वयंसेवकांचा आहे. दिवंगत ज्येष्ठ विधिज्ज्ञ बाबाराव भिडे यांच्यामुळे मी घडलो. हा सत्कार मी भिडे यांना समर्पित करतो. समाजाने मला भरभरून दिले,’ अशी भावना ॲड. जैन यांनी व्यक्त केली. मोहोळ, चंद्रकात पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. गोयल यांनी प्रास्ताविक केले. गजेंद्र पवार यांनी आभार मानले.