पुणे : पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या हिवाळ्यात पहाटे गारठा जाणवला. शिवाजीनगरमध्ये १४.४ तर पाषाणमध्ये १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस पहाटे गारठा जाणविण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात पुणे आणि परिसरात पहिल्यांदाच किमान तापमान १५ अंशांच्या खाली गेले. पाषाणमध्ये १२.८, हवेलीत १३.४, एनडीएमध्ये १३.९, शिवाजीनगरमध्ये १४.४ आणि लवासामध्ये १५.३ अंश सेल्सिअची नोंद झाली आहे.
हेही वाचा : खडकवासला धरणातून मुठा नदीत पाच वर्षांतील सर्वात नीचांकी पाण्याचा विसर्ग
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माळीणमध्ये १३.१, तळेगावात १३.३, शिरूरमध्ये १५.०, बारामतीत १५.१, राजगुरुनगरमध्ये १५.३, नारायणगावात १५.४, पुरंदरमध्ये १५.७ आणि आंबेगावात १५.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील चार दिवस रात्री आणि पहाटेच्या तपामानात घटीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान सरासरी १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहर आणि परिसरात कमाल तापमानातही घट झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी ३५ अशांच्या पुढे असणारा पारा मागील तीन दिवसांपासून ३२ अंश सेल्सिअसवर आला आहे. शुक्रवारी कमाल ३२.१ तर किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.