पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेला उल्लेख निषेधार्ह आहे. पंतप्रधानांनी शरद पवार यांना आपले गुरू संबोधले होते. त्यामुळे आपल्या गुरूविषयी असे शब्द वापरणे योग्य नाही, असा टोला काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी लगावला. मोदी यांनी वापरलेला वापरलेले शब्द पाहता राजकारणाचा स्थर किती घसरला आहे, हे कळते. मोदींची ही भाषा राजकी़य संस्कृतीसाठी दुदैवी असून गेल्या दहा वर्षात केवळ जुमलेबाजी केल्याने मोदींना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, खुर्च्या मोकळ्या असतात, त्यामुळे मोदी आत्मविश्वास गमावत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पुण्यातील रेसकोर्स मैदानावर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी पवार बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : मावळमध्ये महायुतीत अस्वस्थता? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल
पवार म्हणाले, की पंतप्रधानांच्या सभांवेळी निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या मोकळ्या रहात आहेत. पंतप्रधान लोकसभा किंवा विधानसभेला एखाद्या राज्यात पाच सात सभा घेतात, मात्र मोदी एका राज्यात महापालिकेच्या निवडणुकीसारखे एका जिल्ह्यात दोन दोन सभा घेत आहेत. त्यांना स्वत:च्या राज्यात सभा घ्यावी लागते. याचा अर्थ त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले यापेक्षा गेल्या दहा वर्षात त्यांनी काय केले हे सांगितले पाहिजे.
हेही वाचा : कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…
मोदींचे तीन मंत्री राज्य घटना बदलणार असल्याचे सांगतात, तर घटना बदलणार नाही असे मोदी सांगतात. मोदी यांचा अभ्यास नाही, त्यांना देशाच्या इतिहासाचे ज्ञान नाही, चुकीचा इतिहास सांगतात. ते चीनला एवढे का घाबरतात हे कळत नाही. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर सव्वा लाख रुपये कर्ज करून ठेवले आहे, असेही पवार यांनी सांगितले.