पुणे : शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि आमदार रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, आमदार रविंद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पत्रकार परिषद झाली.
त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारासह अनेक भागांतून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत रमेश चेन्नीथला यांना प्रश्न विचारताच, ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. चेन्नीथला यांनी असे म्हणताच त्यांच्या बाजूला बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हातच जोडले. राज्याच्या कोणत्याही भागातून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास ते निवडून येतील, असा विश्वास देखील चेन्नीथला यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : पुण्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना; लष्कर भागातील मॉडर्न डेअरीला फटाक्यांमुळे आग
तसेच ते पुढे म्हणाले की, सध्याचं केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात असून महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलत नाही. पण आम्ही इंडिया आघाडी देशभरात सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असून लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश निश्चित मिळणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार याबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहेत. त्या संदर्भात येत्या काळात लवकरच घोषणा केली जाईल. तसेच महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व ४८ जागा निवडून येतील. सध्याचं राज्य सरकार हे जनतेने निवडून दिलेलं नाही. ते ईडी आणि सीबीआयचं सरकार असल्याचं सांगत चेन्नीथला यांनी भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा : पुण्यातील काँग्रेसमध्ये मनोमिलन नाहीच?… स्नेहभोजनाचा बेत रद्द
महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना अद्यापही सहभागी करून घेतले नाही. त्या प्रश्नावर रमेश चेन्नीथला म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी सोबत घेण्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी सोबत घेण्याबाबत काँग्रेस पक्षाची सहमती असून त्या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.