पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. हिंदूचे सरकार अशी वल्गना करत फिरता. मग गणेशोत्सव, दहीहंडी यासह अनेक सण साजरे करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिस विभागामार्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणी करीत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, गणेशोत्सव काळात पाच दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक लावण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. पण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. ती कारवाई तातडीने थांबवावी आणि दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत,अशी मागणी असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्याबाबत चर्चा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी सकारात्मक चर्चा देखील झाल्याचे धंगेकरांनी सांगितले.