पुणे : अमली पदार्थ तस्करीतील आरोपी ललित पाटील याच्यावर ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर उपचार करत असल्याचे रुग्णालयाच्या दैनंदिन अभिलेखातील माहितीवरून निष्पन्न झाले आहे. डाॅ. ठाकूर यांनी चुकीचे काम केले असतानाही त्यांना निलंबित न करता राज्य शासन पाठीशी घालत आहे. ठाकूर यांनी हवालामार्फत लाखो रुपये घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणात त्यांना सहआरोपी करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
धंगेकर म्हणाले, ललित पाटील याच्या निमित्ताने गुन्हेगारी षडयंत्र उघडकीस आले आहे. गुन्हेगारी क्षेत्राशी संबधित लोकांना एकत्रित करून सध्याचे सरकार सत्तेत आले आहे. ललित पाटील प्रकरणामुळे राज्य सरकारची नाचक्की झाली आहे. ललित पाटीलची बनावट चकमक करून तपास थांबविण्याचा प्रयत्नही होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार
सरकार आणि प्रशासन आरोपी ललित पाटील याच्या पैशाखाली दबले गेले आहे. ललित पाटील याचे उद्योग पोलिसांच्या मेहरबानीने सुरू होते. डाॅ. ठाकूर यांना मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा वरदहस्त आहे. ठाकूर यांना सहआरोपी करून पहिल्या दिवशी अटक होण्याची गरज होती. ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.