पुणे : पोलीस कारवाईच्या भीतीने पसार होण्याच्या तयारीत असलेल्या बांधकाम ठेकेदाराचा इमारतीतून पडून मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. विश्वनाथ गुंडाप्पा बिरेदार (वय ४७, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोेंद करण्यात आली आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील चरवड वस्ती भागात असलेल्या एका इमारतीत शुक्रवारी रात्री काही जण पत्ते खेळत होते. शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बेकायदा धंदे आाणि सराइतांविरुद्ध कारवाईची मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) हाती घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येरवड्यासह शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्या वेळी चरवड वस्ती भागातील एका इमारतीत काही जण पत्ते खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी इमारतीच्या परिसरातील काही जणांची चौकशी सुरू केली. त्या वेळी इमारतीच्या परिसरातील एकजण ‘पोलीस आले’ असे ओरडला. त्यानंतर पोलिसांनी इमारतीकडे धाव घेतली. इमारतीत पोलीस पोहाेचले तेव्हा दोघांनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी इमारतीत सहा ते सात जण होते. एक जण इमारतीतील पाइप पकडून खाली उतरला. बिरेदारही पाइप धरून उतरण्याचा प्रयत्नात होता. चौथ्या मजल्यावरून बिरादार खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : मावळ, शिरूरमध्ये तिरंगी लढत; वंचितकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर

नेमके काय घडले?

पोलिसांचे पथक वडगाव बुद्रुक परिसरातील चरवड वस्ती भागात पोहोचताच इमारतीत पत्ते खेळणारे घाबरले. पोलीस कारवाई करणार असल्याची भीती वाटल्याने इमारतीतून पसार होण्याच्या प्रयत्नात विश्वनाथ बिरेदार चौथ्या मजल्यावरून खाली पडले. बिरेदार जिन्याने उतरला नाही. इमारतीत नेमका काय प्रकार सुरू होता, हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ तीनचे पोलीस आयुक्त संभाजी कदम सिंहगड पोलीस ठाण्यात आले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. पोलीस कारवाईच्या भीतीने बिरेदार पाइप धरून उतरत होते. त्या वेळी त्यांचा पडून मृत्यू झाला, असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune construction contractor died after falling from fourth floor due to fear of police action pune print news rbk 25 css