पिंपरी : सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज घेऊन फाडल्याप्रकरणी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी २५ सप्टेंबर सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी (वय ५६, रा. लुल्लानगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर राजेंद्र साखरे (रा. हिंजवडी) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : चिंचवडमध्ये एसटी बस रस्ता दुभाजकाला धडकली; प्रवासी बचावले
सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक होती. सरपंचपदासाठी मयुर साखरे आणि गणेश जांभुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज छाणणीच्यावेळी आरोपी साखरे यांनी जांभुळकर यांच्या अर्जावर हरकत घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नाईकवाडी यांच्याकडून हिसकावून ताब्यात घेतला. तो फाडून टाकला. फाडलेला अर्ज स्वत:च्या ताब्यात ठेवून सरकारी कामात अडथळा, अटकाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.