पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन कोयत्याच्या धाकाने तिला लुटण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाइल संच, अन्य वस्तू असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. दहा दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर इशान्य भारतातील एका विद्यार्थ्याला मारहाण करुन लुटण्यात आल्याची घटना घडली होती.
याबाबत अबिनियू चवांग (वय ३६, रा. रोहन नील अपार्टमेंट, ओैंध) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई रविवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी १८ ते २० वयोगटातील चाैघांनी त्यांना अडवले. त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. दोघांना मारहाण केली, तसेच अबिनियूची मैत्रीण चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यांच्याकडील मोबाइल संच, इअर बड, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेले अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गेले. रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक प्रवीण चौगले तपास करत आहेत.
हेही वाचा : कृष्णविवराभोवतीच्या तारकीय; अवशेषांतून नाट्यमय उद्रेक; आयुकाचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन गटाचा शोध
बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यापूर्वी बाणेर टेकडी परिसरात इशान्य भारतातून शिक्षाणासाठी आलेला विद्यार्थी आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीनांसह साथीदारांना अटक केली होती. बोपदेव घाट प्रकरणानंतर शहरातील टेकड्या, निर्जन भागात प्रखर प्रकाशझोत बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात सांगितले होते. टेकड्यांच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.