पुणे : भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे खडसे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात खडसे यांच्याविरुद्ध लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा म्हणून खडसे यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विशेष न्यायाधीश जाधव यांनी खडसे यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
हेही वाचा : एमपीएससीतर्फे विविध विभागांमध्ये मोठी भरती, अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून
या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी खडसे यांनी बुधवारी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. खडसे यांच्या जामीन अर्जावर तीन जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती लाख लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खडसे हे मंत्री असताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि सुनेच्या नावे तीन कोटी ७५ लाख रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसे यांनी जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.