पुणे : महिलेला मारहाण करुन तिचा छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने तडाखा दिला आहे. पतीपासून संरक्षण मिळवण्यासाठी एका महिलेने दाखल केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.पी. खंदारे यांनी मंजूर केला. पत्नीशी संपर्क साधू नये, तसेच तिच्या घरात प्रवेश करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पतीकडून चारित्र्याचा संशय घेऊन छळ करण्यात येत होता. शिवीगाळ करुन मारहाण केली जात असल्याने एका महिलेने वकील ॲड. पुष्कर पाटील आणि ॲड. प्रणव मते यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
मुख्य तक्रारीच्या सुनावणीपूर्वी अंतरिम अर्जाद्वारे पतीपासून तातडीने संरक्षण मिळावे अशी मागणी महिलेकडून करण्यात आली होती. पत्नीचे वकील ॲड. पाटील आणि ॲड. मते यांनी . सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यांचे दाखले दिले, तसेच आवश्यक पुरावे सादर करुन पतीला पत्नीच्या घरात प्रवेश करण्यापासून मज्जाव करावा, अशी विनंती युक्तीवादात केली.
हेही वाचा : पुणे महापालिकेला दणका : पुणेकरांचे ३५४ कोटी रुपये जाणार ‘पाण्यात’
विरोधी पक्षाला आणि वकीलांना संधी देण्यात आली. मात्र, त्यांनी त्यांचे म्हणणे न मांडल्याने अंतरिम आदेश करण्याची मागणी पत्नीच्या वकिलांनी केली. पत्नीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने मारहाण करु नये, तसेच पत्नीशी संपर्क साधू नये आणि तिच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असे आदेश न्यायालयाने पतीला दिले आहेत.