पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी उज्वला जितेंद्र गौड, शरयू परब, हेमंत दत्ता गायकवाड, राज निल, मुन्ना विठ्ठल गायकवाड, साक्षी गौड यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस नाईक अनुराधा मुळीक यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
हेही वाचा : मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा, पुण्यातील शरद पवार यांच्या मोदी बागेतील ऑफिससमोर पोलीस बंदोबस्त
शनिवारी (१० ऑगस्ट) रात्री फर्ग्युसन रस्त्यावरील वाडेश्वर हाॅटेलजवळ बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या उज्वला गौड आणि सहकाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनामुळे रहदारीला अडथळा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस नाईक मुळीक यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करत आहेत.