कोथरुड म्हणजे एक शांत, मध्यमवर्गीय, सुखवस्तू पुणेकरांची वस्ती. मध्यवर्ती भागातील वाडे काळाच्या पडद्याआड जात असताना कोथरुडने उभारी घेतली आणि बघता-बघता कोथरुडचा नियोजनबद्ध विस्तार होत गेला. त्याची भूरळ खासकरून मुंबईकरांना पडल्याने अनेक निवृत्तांनी कोथरुडचा आसरा घेतला. ‘निवृत्तांचे शहर’ ही पुण्याची ओळख होण्यात कोथरुडचा वाटा मोठा; पण हेच कोथरुड आता गुन्हेगारी कृत्यांनी नाहक बदनाम होऊ लागले आहे, याला जबाबदार कोण?

पौड रस्त्यावरील चांदणी चौकापासून ते पौडफाटा आणि कोथरुड गावठाण ते डहाणूकर कॉलनी, हॅपी कॉलनीपासून कर्वेनगरपर्यतच्या या कोथरुड भागाने एक वेगळा ठसा आजवर उमटविला आहे. शांततेबरोबरच विविध सामाजिक, साहित्यिक उपक्रमांमुळे या परिसराला पुणेरीपणाचा वसा लाभला आहे. त्यामुळे साहजिकच कोथरुडला निवास करण्याकडे अनेकांचा ओढा दिसतो. पौडरस्त्यावरील कचरा डेपोचे स्थलांतरण झाल्यानंतर या परिसराचा आणखी वेगाने उत्कर्ष झाला आणि अल्पकाळात विकसित झालेला परिसर म्हणून कोथरुडची नोंद झाली.

कोथरुडची ही नवी ओळख होण्यापूर्वी साधारणत: १९८० नंतर या भागात लोकवस्ती वाढू लागली. त्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती कारणीभूत होती. आजूबाजूला गावांचा परिसर. त्या गावांतील रहिवाशी कामानिमित्त शहराकडे स्थलांतरीत होऊ लागले. निवाऱ्यासाठी जागा नसल्याने मोकळ्या जागांवर घरे बांधली जाऊ लागली. या घरांमध्ये राहणारे बहुतांश रहिवाशी हे मुळशी आणि परिसरातील होते. ९० च्या दशकात या गावांमधील स्थलांतरीत नागरिकांची संख्या वाढत गेली आणि कोथरुडमध्ये केळेवाडी, हनुमान नगर, जयभवानी नगर, किष्किंदानगर या वस्ती वाढल्या. या वस्त्यांमध्ये अन्य भागांतीलही नागरिक राहू लागल्यानंतर कोथरुडमध्ये गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्यातून ‘झोपडपट्टी दादा’ निर्माण होऊ लागले. या वस्त्यांबरोबर डहाणूकर कॉलनी, हॅपी कॉलनीसारखी सुखवस्तू परिसरही विकसित झाला. त्या ठिकाणी मुंबईतील अनेकजण निवृत्तीनंतर या भागाला पसंती देऊ लागल्याने हा सुखवस्तू भाग आणि दुसरीकडे बकाल झोपडपट्ट्या असे कोथरुडचे चित्र निर्माण झाले.

या भागात विकास होत असताना मुळशीतील गावांच्या जमिनींचे भाव वाढू लागले आणि ९० च्या दशकातील पिढीला नशिबाने साथ दिली. हाती पैसा खेळू लागला आणि शौक वाढले. लग्नसमारंभात श्रीमंतीचे दर्शंन घडू लागले. तमाशाच्या फडात दौलतजादा होऊ लागली. खिसे रिकामे झाल्याने श्रीमंती आणि मौजमजेची नशा उतरू लागली. पैशासाठी खून पडू लागले आणि कोथरुडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ने डोके वर काढले. आधीच्या पिढीने उधळलेल्या पैसा तरुण पिढीला दिशेनासा झाला. गावातील जमिनी गेल्या आणि पैसाही संपल्याने नवी पिढी पुणे शहराकडे वळू लागली. निवाऱ्याचे ठिकाण अर्थातच झोपडपट्ट्या. त्यामुळे कोथरुड भागात झोपडपट्ट्यांची संख्या आणखी वाढली. रेडझोनलगत सुतारदरासारखी लोकवस्ती, सध्या भवानी माता मंदिर असलेला डोंगर झोपड्यांनी व्यापला. या ठिकाणी राहणारी बहुतांश तरुण पिढीच्या हाताला काम नसल्याने कोथरुडमध्ये गुन्हे वाढले. पौड रस्त्यावर आनंदनगरजवळ रस्त्यामध्ये असलेले भवानी मातेचे मंदिर डोंगरावर बांधण्याचा निर्णय झाला आणि डोंगरावरील झोपड्या काढून त्या रहिवाशांना कोथरुडमध्येच स्थलांतरित करण्यात आले. काहींना शास्त्रीनगर येथे, तर काहीजणांना शांत असलेल्या डहाणूकर कॉलनीजवळील मोकळ्या जागेत हलविण्यात आले. त्यामुळे नकळत गुन्हेगारांच्या वस्ती वाढल्या. शास्त्रीनगर हा भाग तर गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनला.

शांत कोथरुडचा गुन्हेगारीचा उग्र चेहरा मागील सुमारे १५ ते २० वर्षांत तयार झाला. बेकार तरुणांनी संघटित गुन्हेगारीची वाट धरली. त्यामुळे कोथरुडमध्ये टोळ्यांचा सुळसुळाट झाला. राजकीय पाठबळ आणि टोळ्यांच्या म्होरक्यांकडून सर्वप्रकारची रसद पुरविली जाऊ लागल्याने टोळ्यांचे पाय घट्ट रोवले जाऊ लागले. राजकीय पक्षांकडून सण आणि उत्सव साजरा करण्यासाठी काही मंडळांना सढळ हातांनी मदतीचा ओघ सुरू झाला. राजकीय पक्षांचे हे सौजन्य कोथरुडसाठी घातक ठरत गेले. अनेक वर्षांपासून असलेली कोथरुडची शांतता भंग पावली.

कोथरुड गावठाणात उरुस होतो. त्यानिमित्ताने एकेकाळी कुस्त्यांचे फड जमायचे. लोक एकमेकांना भेटायचे. भजन, कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे. त्याच कोथरुडमध्ये आता सण, उत्सवाला स्पीकरच्या भिंती उभ्या राहू लागल्या. त्यातून ताकदीचे दर्शन घडविले जाऊ लागले. अर्थातच सौजन्य हे कोणत्या तरी राजकीय पक्षाचे असायचे. पक्षांचे नेते कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी खिसे रिकामे करू लागले. ते मंडळ आणि कार्यकर्त्यांचे तारणहार आणि आधारस्तंभ होऊ लागले. त्यांचे फलक झळकून आदरभाव व्यक्त होऊ लागला. हेच हक्काचे कार्यकर्ते वेळप्रसंगी दोनहात करण्यासाठी उपयोगी पडू लागले आणि कोथरुड हे गुन्हेगारांचे आगार असल्यासारखी स्थिती निर्माण झाली.

बदलत्या काळानुसार कोथरुडचा चेहरा बदलला. त्यामुळे या भागावरील पुणेरीपणाचा ठसा पुसला जाऊ लागला आहे. पुणे म्हणजे मध्यवर्ती पेठा आणि अर्थातच कोथरुड, हे पुणेकर आजवर अभिमानाने सांगत आले आहेत. आता कोथरुड म्हणजे गुन्हेगारी, असे बोलले जाऊ लागले आहे. याला जबाबदार कोण?

sujit.tambade@expressindia.com

Story img Loader