पुणे : सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका खासगी कंपनीची ४१ लाख रुपयांची फसवणूक टळली. पोलिसांनी चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती बँकेला केली. पोलिसांच्या तत्परतेने तपास केल्याने खासगी कंपनीला रक्कम परत मिळवून देण्यात यश आले. याबाबत एका नामांकित खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार अधिकाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून संदेश पाठविण्यात आला होता. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशात चोरट्याने कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक असल्याची बतावणी केली.

संदेश पाठविण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक व्यक्तिगत असल्याची बतावणी करण्यात आली. एका महत्त्वाच्या बैठकीत असून, तातडीने कंपनीच्या वित्त विभागातून ४१ लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्याची सूचना संदेशात दिली होती. त्यानंतर कंपनीच्या वित्त विभागाकडून बतावणी करणाऱ्या चोरट्याच्या खात्यात ४० लाख ९० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. फसवणुकीचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर कंपनी प्रशासनाकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

त्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले हाेते. संंबंधित बँक खाते परराज्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी परराज्यातील बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती केली. संबंधित कंपनीच्या बँक खात्यात पुन्हा रक्कम वळविण्यात आली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस कर्मचारी नवनाथ कोंडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे, सोनाली चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader