पुणे : दैनंदिन वापरातील ६० ते ६५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी प्रतिदिन कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नदीत घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नदीसुधार प्रकल्पाला केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत इंद्रायणीत दररोज ६५ एमएलडी सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पीएमआरडीएकडून याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने हा अहवाल स्वीकारला असून तो अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण ५४ गावे, शहरांमधून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून नदी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : ‘एनडीए’त उभारला जातोय थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा; अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन

यामध्ये प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी या तीन नगरपरिषदा, वडगाव आणि देहू या दोन नगरपंचायत, देहू कटक मंडळ, १५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती, इतर ४६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. केंद्र, राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रण या कामास भांडवली किमतीच्या ६०:४० टक्के प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. ५७७.१६ कोटी रकमेचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने स्वीकारला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune daily 60 to 65 mld sewage discharged into indrayani river pune print news psg 17 css
Show comments