पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, नूतन मराठी विद्यालयातील नामवंत शिक्षक न.म. कुलकर्णी तथा अक्षर गुरुजी यांनी व्रतस्थपणे ७२ वर्षे निष्ठेने चालविलेल्या दासनवमी उत्सवाची वाटचाल शंभरीकडे सुरू आहे. या उत्सवाची धुरा अक्षर गुरुजींचे पुत्र नंदू कुलकर्णी समर्थपणे सांभाळत असून, यंदा या उत्सवाचे ९९ वे वर्ष आहे. १३ ते २२ फेब्रुवारी दरम्यान आनंदाश्रम, नू.म.वि. प्रशालेशेजारी, बाजीराव रस्ता येथे होणाऱ्या या उत्सवात कीर्तन आणि व्याखानांच्या पर्वणीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, सोनोपंत दांडेकर, रा.शं. वाळिंबे, कुंजविहार भोपटकर, धर्मवीर डावरे, रँग्लर ग.स. महाजनी आदींनी या उत्सवासाठी त्या काळी योगदान दिले होते. त्या वेळी या उत्सवात अनेक विद्याविभूषित कीर्तनकारांनी हजेरी लावलेली आहे. त्यावेळी भजनी मंडळांचे कार्यक्रम, संगीत सभांच्या बरोबरच दासबोध पारायणदेखील होत असत. या शिवाय काही मनोरंजनाचे कार्यक्रम, मल्लखांबाच्या कसरती, पोवाड्यांचे कार्यक्रम या उत्सवात झालेले आहेत.

समर्थ सेवा संघामार्फत सुरू असलेल्या या उत्सवात रोज दुपारी चार ते साडेपाच या दरम्यान कीर्तन सत्र होणार आहे. तर संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनसेवेमध्ये ह.भ.प. ऋचा प्रभुणे, ह.भ.प. संज्योत केतकर, ह.भ.प. तेजस्विनी कुलकर्णी, ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी, ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे, ह.भ.प. स्मिता मराठे, ह.भ.प. पुंडलिकबुवा हळबे आदींची सेवा घडणार आहे. व्याख्यानमालेत अर्थतज्ज्ञ, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक प्रा. अभय टिळक, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, संत साहित्य अभ्यासक व्याख्यात्या-प्रवचनकार डाॅ. आरती दातार, युद्ध सेवा मेडल प्राप्त ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संस्कृत पंडित डाॅ. सुचेता परांजपे, लेखिका शेफाली वैद्य, लेखक दिलीप कुलकर्णी यांच्या व्याख्यानांचा समावेश करण्यात आला आहे. या उत्सवाची सांगता दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. श्री. पुंडलिकबुवा हळबे यांचे सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत होणाऱ्या निर्याण कीर्तनाने तर संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत शास्त्रीय गायिका मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने होणार आहे.

आनंदाश्रम संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वसंत आपटे यांचे सहकार्य असलेल्या या उत्सवात अधिकाधिक समर्थप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव संयोजक नंदू कुलकर्णी यांनी केले आहे.

‘अक्षर गुरुजी’ आणि उत्सव

न.म. कुलकर्णी समर्थभक्त होते. आनंदाश्रमात उत्सव सुरू करण्यापूर्वी ते शनिवार पेठेतील वाड्यात जेथे भाड्याच्या घरात राहात होते, तेथील अंगणात हा उत्सव सुरू केला. न.म. यांचा संतवाड्मयाचा अभ्यास होता. ते स्वतःही हिंदी आणि मराठीतून कीर्तन करीत असत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात त्यांनी रघुवीर मेळा स्थापन करून अनेक ठिकाणी जनजागृतीसाठी पोवाड्याचे कार्यक्रम केले होते.

ह. ना. आपटे संस्थेचे पहिले व्यवस्थापकीय विश्वस्त

आनंदाश्रम ही पुणे शहरातील संस्कृतचा अभ्यास आणि संशोधन करणारी संस्था आहे. उच्च न्यायालयाचे वकील महादेवराव चिमणाजी आपटे यांनी ही वास्तू उभारताना आपली सगळी पुंजी खर्च केली. कादंबरीकार, सुधारक, विचारवंत, संस्कृतवादी आणि पत्रकार हरी नारायण आपटे हे या संस्थेचे पहिले व्यवस्थापकीय विश्वस्त होते.