पुणे : उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी भागात घडली.चंद्रकला नरसिंग मिरदुडे (वय ४५, रा. विसर्जन घाट, बालेवाडी गाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकला यांचा मुलगा संदीप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला बालेवाडीतील अमर टेकपार्क इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. कंत्राटी पद्धतीने त्या तेथे काम करत होत्या. मंगळवारी दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाला. काम आटोपल्यानंतर चंद्रकला बसथांब्याकडे निघाल्या होत्या. बालेवाडी भागातील पदपथाच्या बाजूला पाणी साचले होते. या परिसरात विद्युत वाहिनी उघड्यावर पडली होती. तेथून निघालेल्या चंद्रकला यांना विजेचा धक्का बसल्याने त्या कोसळल्या. बेशु्द्धावस्थेत चंद्रकला पडल्याची माहिती त्यांचा मुलगा संदीप यांना मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर चंद्रकला यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. महावितरणच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांकडून महावितरणला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा…पुणे : आरोपी अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातच मुक्काम, बाल न्याय मंडळाचा आदेश; कल्याणीनगर अपघात प्रकरण

बेजबाबदारपणाचा दुसरा बळी

गेल्या महिन्यात हडपसर भागात पाऊस झाला. त्यावेळी तेथे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. साचलेल्या पाण्यातून निघालेल्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. बालेवाडी भागात उघड्यावर पडलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा धक्का बसल्याने चंद्रकला मिरदुडे यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune death of a cleaning worker due to electric shock accident in balewadi area pune print news rbk 25 psg
Show comments