पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. अनेक निर्णयांतून तसे दिसून आले आहे. त्यामुळेच वाद टाळण्यासाठी अजित पवार यांनी मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला येण्याचे टाळल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील बदलत्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर ते पालकमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी कुरघोडी करण्यास सुरूवात केली होती.
हेही वाचा : पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात
विविध विभागांच्या बैठका घेत त्यांनी जिल्ह्यावर पकड मिळवली होती. पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केलेला निधी त्यांनी रोखला होता. त्याबाबतची तक्रार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाचा वाद उद्भवू नये यासाठी अजित पवार यांनी विसर्जन मिरवणुकीला येण्याचे टाळले अशी चर्चा सुरू झाली आहे. महापौरांच्या हस्ते मानाच्या गणपतींची आरती करण्यात येते. मात्र सध्या महापौर नसल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. मात्र अजित पवार या वेळी अनुपस्थित राहिले. दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजता अजित पवार उपस्थित राहणार आहेत, असे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.