पुणे : मुळशी तालुक्यातील मांदेडे गाव लवकरच कर्बभाररहित आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संकल्पनेतून आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या सहकार्याने हे गाव कार्बनमुक्त करण्याचा मानस असून, त्यासाठी ‘नेट झीरो’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
गावातील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्थानिक समस्या सोडविण्यावर या प्रकल्पांतर्गत भर दिला जाईल, अशी माहिती प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे हे या प्रकल्पाचे ‘ब्रँड ॲम्बॅसिडर’ आहेत. गोखले संस्थेच्या शाश्वत विकास केंद्राचे डॉ. गुरुदास नूलकर, मांदेडे गावच्या सरपंच सविता वीर या वेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा… ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’! आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत उपचार
प्रकल्पातंर्गत गावातील आरोग्य, ऊर्जा, पाणी यांसह गावकऱ्यांचा उदरनिर्वाह, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन विषयांवर पुढील दोन वर्षांत काम करण्यात येणार आहे. पाणलोट व्यवस्थापन योजना, ऊर्जानिर्मितिक्षम पिकांची लागवड, पीक पद्धती आणि औद्योगिक वापरातील कच्च्या मालाचे व्यवस्थापन याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे डॉ. चौधरी यांनी या वेळी सांगितले. या विकासामुळे ‘मुळशी पॅटर्न रिटर्न्स’ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडवर आणखी पाणी कपातीची टांगती तलवार, पवना धरणात एवढेच पाणी शिल्लक
मांदेडे गावाच्या ऊर्जेच्या गरजा, सध्याची उदरनिर्वाहाची साधने, पाण्याची गरज, पाणलोट क्षेत्राचे नकाशारेखन, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, हवामान बदलामुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न यावर आधारित प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम गोखले संस्थेमार्फत सुरू आहे.
मुळशी तालुक्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी हब) आले. लवासा सिटीही आली. विकास झाला असला, तरी त्यात गाव कुठेच दिसले नाही. परंतु, आता ‘नेट झीरो’ प्रकल्पामध्ये गावपण तसेच ठेवून, गावाच्या विकासासाठी उभारलेले प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर मांदेडे हे संपूर्ण भारतात ते गाव आदर्श ठरेल. – प्रवीण तरडे, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक