पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी आठ ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला बाकी ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले आहे. मावळ, भोर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, चिंचवड आणि पुण्यातील पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. यात पुण्यातील चार मतदारसंघांत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार असून, मावळ, भोर, पुरंदर, जुन्नर आणि चिंचवडमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांवरून एकमत न झाल्याने अनेकांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे उभे राहिले होते. महाविकास आघाडीमध्ये चार ठिकाणी, तर महायुतीमध्ये तीन ठिकाणी बंडखोरी झाल्याचे चित्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे आले. या बंडखोरीचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्यांना तंबी, मनसेचा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पुण्यात माजी उपमहापौर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल यांनी पर्वती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यांच्यासह कसब्यातून पुण्याच्या पहिल्या महिला महापौर, काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे यांनीही बंडखोरी केली आहे. तर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद निवडणूक लढविणार आहेत. या तिघांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांसून त्यांची सातत्याने भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरला. काँग्रेसच्या या तिघा बंडखोरांमुळे महायुतीमधील भाजपच्या अनुक्रमे माधुरी मिसाळ, हेमंत रासने आणि सिद्धार्थ शिरोळे या उमेदवारांना त्याचा फायदा होईल, अशी चर्चा आहे.

जिल्ह्यात मावळ मतदारसंघात महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बापू भेगडे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला होता. भेगडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, भाजप पदाधिकाऱ्यांनीही भेगडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले होते. त्यामुळे त्यांनी अर्ज कायम ठेवला असून, महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा :शरद पवार यांचे बारामतीकडे विशेष लक्ष, आज बारामतीत सहा सभा

पुरंदर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्याचा फटका शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांना बसण्याची शक्यता असून, येथे तिरंगी लढत होणार आहे. भोर मतदारसंघातही शिवसेनेचे (शिंदे) नेते कुलदीप कोंडे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. महायुतीच्या जागावाटपात भोरची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे गेल्याने ते नाराज होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर कोंडे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षातून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला होता. कोंडे यांची बंडखोरी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल, असे चित्र सध्या आहे.

इंदापूर मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपमधून आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे स्थानिक नेते नाराज झाले होते. त्यापैकी सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला, पण तो अपयशी ठरला. माने यांच्या उमेदवारीमुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणींत वाढ होईल, अशी चर्चा आहे. त्यातच जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करून, त्या पक्षाचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटल्याने पाटील यांच्यासमोर आव्हान असेल.

हेही वाचा :हडपसर मधील नागरिक ‘ या’ कारणांमुळे त्रस्त !

चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असून, भोईर यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना, की राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे यांना होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार शरद सोनवणे आणि भाजप नेत्या आशा बुचके यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune district rebel in mahayuti and mahavikas aghadi at 9 vidhan sabha constituencies pune print news apk 13 css