पुणे : समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. तरुणी गर्भवती झाल्यानंतर आरोपी तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला धमकावून डाॅक्टरकडून नेऊन बेकायदा गर्भपात केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणासह डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निरंजन बाजीराव घुले, त्याचे वडील बाजीराव, आई, मेहुणे मल्हार कुंजीर, मित्र समीर चौधरी, डाॅ. डी. वाय. मोटे, डाॅ. राजश्री मोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात शिक्षणानिमित्त स्थायिक झाली. समाजमाध्यमात तिची आरोपी निरंजन घुले याच्याशी ओळख झाली. निरंजनने तिला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणी गर्भवती झाल्याची माहिती निरंजनच्या आई वडिलांना मिळाली. त्यांनी तरुणीला गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात न केल्यास जीवे मारु, तसेच उजनी धरणात फेकून देऊ, अशी धमकी दिली. तरुणीला धमकावून ऊरळी कांचन येथील डाॅ. मोटे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे तिचा बेकायदा गर्भपात करण्यात आल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.