पुणे : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या ९५ व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. अमृतमहोत्सवी राज्यघटना दिन साजरा होत असताना मंगळवारी डाॅ. आधाव यांनी हे जाहीर केले.
महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानतर्फे राज्यघटनेचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ही घोषणा करतानाच आपले काही सहकारी आत्मक्लेश उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती डाॅ. आढाव यांनी दिली. डाॅ. आढाव म्हणाले, ‘देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक पाहत आलो. बराच काळ त्याचा भागही होतो. पण, आता सुरू असलेला भ्रष्टाचार यापूर्वी कधीही पाहिला नाही.
हेही वाचा : चहा आणि कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन मोलकरणीने लांबविले १६ लाखांचे दागिने
निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे. मतदान सुरू होण्याआधी आणि असताना कोट्यवधी रुपये मध्यस्थ आणि मतदारांना वाटले गेले. निवडणूक आयोगाने जी रोख रक्कम आणि वस्तू पकडल्या त्याचे जाहीर केलेले अधिकृत आकडेही शेकडो कोटींच्या घरात आहेत. याच दरम्यान अमेरिकेमध्ये देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याचे पंतप्रधान खुलेआम समर्थन करत आहेत. ही देशाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
हेही वाचा : बेशिस्त वाहतुकीचे पुणे परवाना चाचणीत ‘नापास’
या सर्व प्रकारात संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा खून होत आहे. भारतीय नागरिक म्हणून आम्ही अतिशय अस्वस्थ आहोत. जे चाललंय त्याला मूक राहून संमती देऊ शकत नाही. त्याविरुद्ध बोलण्याचे बळ भारतीय राज्यघटनेने दिले आहे. म्हणून राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षी ही नैतिक जबाबदारी आम्ही घेत आहोत. यातून तरी लोकांना जाग यावी आणि त्यांनी या व्यवस्थेचा विरोध करावा, असे आवाहन आढाव यांनी केले. ॲड मोहन वाडेकर, नितीन पवार, हनुमंत बहिरट, चंदन कुमार, ओंकार मोरे, प्रकाश वाघमारे, शीतल परदेशी, विजयानंद रांजणे, विजय जगताप, रमेश उणेचा या वेळी उपस्थित होते.