पुणे : ‘माझ्या जन्मानंतर पाच-सहा महिन्यांतच वडील वारले. वैधव्याच्या दुःखाला सामोर जावे लागलेली आई खचली नाही. उलट पदर खोचून ती नियतीविरुद्ध उभी राहिली. आई-वडील अशा दोघांची भूमिका उत्कृष्टपणे निभावत तिने सर्व भावंडांना आयुष्यात उभे केले. हे सर्व करताना कितीही संकट आली तरी तुम्ही नेकीनं जगलं पाहिजे, असा तिचा आग्रह असायचा. आम्ही भावंड काही करू शकलो असू तर त्यामागे नेकीने जगा, ही आईची शिकवण कारणीभूत आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी सोमवारी मातृस्मृतींना उजाळा दिला.  

बबुताई आढाव यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांनी आईच्या आठवणी जागविल्या. त्यावेळी ते बोलत होते. कष्टाच्या भाकर येथे काम करणाऱ्या रंजना धोंडीबा दहिभाते आणि भरत लक्ष्मण पारगे या कामगारांचा रोख रक्कम, श्रीफळ आणि फुले देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर झेंडे,  निवृत्त शिक्षिका रजनी धनकवडे, शीला आढाव, उद्योजक किरीट शामकांत मोरे, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शारदा वाडेकर, बाजार समितीचे कामगार संचालक संतोष नांगरे, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे, उपाध्यक्ष दत्तात्रय डोंबाळे या वेळी उपस्थित होते.

डाॅ. आढाव म्हणाले, ‘सौभाग्यापेक्षा एकटेपण सांभाळण कठीण असते, असे आई सांगायची. इतक्या विपरीत काळातही ती डगमगली नाही. नियतीने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले अशी तुम्हा मुलांनी गाजवलेल्या कर्तृत्वावरून आता खात्री पटते, असे ती म्हणायची. त्याकाळी सेवासदन संस्थेत जाऊन तिने शिवणकला शिकून घेतली. कौशल्यपूर्ण शिवण काम करत मुलांना वाढवले. उत्कृष्ट शिक्षण दिले. हमाल पंचायतीने कष्टाची भाकर सुरू केल्यावर आपली क्षुधाशांती करायला येणाऱ्या कष्टकरी गरिबांना ताजे स्वच्छ सकस अन्न मिळेल याकडे तिचा कटाक्ष असायचा. आईने दीर्घकाळ लक्ष दिल्यामुळे या उपक्रमाला एक प्रकारची शिस्त लागली आणि अलीकडेच कष्टाच्या भाकरने पन्नास वर्षंचा टप्पा पूर्ण केला आहे.’

अनपेक्षित बोनस

कष्टाच्या भाकर येथील कामगारांना दरवर्षी दिवाळीत बोनस दिला जातो. पण, आज अनपेक्षितपणे आर्थिक पुरस्कारचा बोनस सर्व महिला कामगारांना मिळाला. बाबा आढाव यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि निवृत्त मुख्याध्यापिका इंदुताई शामकांत मोरे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीनिमित्त किरीट मोरे यांनी पुरस्कार प्राप्त कामगारांसह सर्व महिला कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा आर्थिक पुरस्कार दिला.