पुणे : प्रगत मराठ्यांनी त्यांच्यातीलच वंचित आणि गरिब मराठ्यांना स्वीकारले नाही. संधीची कवाडे नाकारलेल्या मराठ्यांमधील मनोज जरांगे हे अनघड नेतृत्व आहे. अण्णा हजारे आधी असेच अनघड होते, पण ते जेव्हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आले, तेव्हा काय झाले हे आपल्याला माहितच आहे. मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेले नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी व्यक्त केले. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ‘आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य’ या विषयावरील चर्चासत्राचे अध्यक्ष या नात्याने डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. या चर्चासत्रात सारंग दर्शने, डॉ. बाळासाहेब सराटे आणि प्रा. अविनाश कोल्हे सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शिक्षक, अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का दिले?

डॉ. सप्तर्षी म्हणाले की, मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे. त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे. उच्चवर्णीय मराठ्यांनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मराठ्यांमधील उतरंडीच्या क्रमानुसार खालच्या श्रेणीतील मराठ्यांना काळानुरूप राजकीय शहाणपण आले असून ते त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. प्रा. कोल्हे म्हणाले की, जागतिकीकरणानंतर सर्वच परिमाणे बदलली. सरकारने अनेक क्षेत्रातून माघार घेत खाजगीकरण केले. त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या. सध्याची आरक्षणाकरीता सुरू असलेली भांडणे पाहून समोर असे काय आहे की ज्यासाठी ही भांडणे सुरू आहेत, असा विचार मनात येतो. दर्जेदार शिक्षणाचा अभाव हे आरक्षणामागील मूळ आहे. आपल्याला आपले अग्रक्रम तपासून पाहण्याची आणि बदलण्याची आवश्यकता आहे.  

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune dr kumar saptarshi said till now manoj jarange has not became anna hazare pune print news vvk 10 css