पुणे :“देशातील सामान्य लोकांपर्यंत आजही आपण खरे ज्ञान पोहचवू शकलो नाही, याची मनोमन खंत वाटते खरे ज्ञान पोहोचवून ज्ञानातील विषमता दूर करण्याचे आव्हान देशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पेलावे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रचिती’ या १९९० च्या दशकातील महाविद्यालयीन संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवकथन आणि वाटचालीवर आधारित लेखांचे संकलन असलेल्या ‘हे तो प्रचितीचे जगणे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आणि स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी गाडगीळ बोलत होते.

गाडगीळ म्हणाले, ‘येत्या तीन वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे भाषेत क्रांती घडून येईल आणि जगातील सर्व भाषेतील ज्ञान सर्वांना अगदी सहज उपलब्ध होईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा नेणे गुरूजनांना शक्य होईल. गुगलमधील इमेज ॲपमुळे आदिवासी तरुण वनरक्षकांनाही दुर्मीळ वनस्पतींची शास्त्रोक्त नावे मोबाईलद्वारे फोटो काढून लगेच बघता येतात. नवं तंत्रज्ञान अशाप्रकारे सर्वांनाच ज्ञानार्जन करण्याला उपयुक्त ठरत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे.”

‘हे तो प्रचितीचे जगणे…’ या पुस्तकातील लेखकांचं जगणं, जीवनानुभव आणि चळवळीविषयी वाचकांना जाणून घेता येईलच. पण, त्याचबरोबर संस्थात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर कसे उभे करावे,  याचा हे पुस्तक आदर्श ठरेल, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. माझ्या आयुष्यात अशी ‘प्रचिती’ आली असती तर माझ्यासमोरच्या प्रश्नांकडे मीही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकलो असतो. समाजकार्य करताना ‘मी नाहीतर कोण आणि आता नाही तर केव्हा?’ ह्या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करत राहणे आवश्यक आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला.

अजित कानिटकर, विवेक कुलकर्णी यांनी प्रचिती विचार चिंतन या विषयीची सविस्तर भूमिका मांडली. राजेंद्र आवटे यांनी पुस्तक निर्मितीमागचा इतिहास सांगितला. वैशाली कणसकर, गीतांजली देगावकर, संग्राम गायकवाड, नीलम ओसवाल आणि मुकेश कणसकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune dr madhav gadgil said social workers should take challenge to eliminate the disparity in knowledge in society pune print news vvk 10 css