पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील निधी खर्च होणार नाही, असे स्पष्ट करत काही महिन्यांपूर्वी समाविष्ट गावांसाठी अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण महापालिकेने केले होते. मात्र, या परिसरात ‘जीबीएस’चे रुग्ण आढळल्याने उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांंचे आदेश आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार या २३ गावांंतील मलवाहिन्या दुरुस्त करून काही भागांत नव्याने मलवाहिन्यांची कामे करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
महापालिकेच्या हद्दीत समावेश असलेल्या सिंहगड रस्त्यावरीव खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी यांसह आजूबाजूच्या गावांमधील मलवाहिन्यांची कामे करण्यासाठी महापालिकेला हा खर्च करावा लागणार आहे. या गावांतील मलवाहिनी दुरुस्त करणे तसेच काही ठिकाणी नव्याने मलवाहिनी टाकण्यासाठी महापालिका प्रशासन हा खर्च करणार असून, सुरुवातीच्या टप्प्यात सव्वा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील नांदोशी, खडकवासला, डीएसके विश्व यासह किरकिटवाडी या भागात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. या भागातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने पिण्याचे शुद्ध पाणी दिले जात नाही. या भागात असलेल्या विहिरीमध्ये महापालिका थेट धरणातून उचललेले पाणी सोडते.
मिळकतकर वसुलीस निर्बंध
सिंहगड रस्त्यावरील या गावांसह इतर भागातील २३ गावे महापालिकेच्या हद्दीत आलेली आहेत. या गावांमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देता याव्यात, यासाठी महापालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महापालिकेने भरीव तरतूद केली होती. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या समाविष्ट गावांतील मिळकत कर वसूल करण्यास राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे महापालिकेला येथून महसूल मिळत नाही. त्यामुळे या गावात पायाभूत सुविधा देण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
असा होणार खर्च
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे, किरकिटवाडी, नांदोशी, खडकवासला परिसरातील मलवाहिन्यांची कामे करण्यासाठी २७.७२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तर, नांदेड गावातील विहिरीमधून या भागाला पाणीपुरवठा होतो. त्या विहिरीच्या आजूबाजूला अनेक बांधकामे झाली असून या इमारतीचे घाण पाणी थेट विहिरीत येत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी नव्याने मलवाहिनी टाकणे आवश्यक असल्याने या कामासाठी ९८ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, खडकवासला, किरकिटवाडी भागात जीबीएसचे रुग्ण आढळत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या होत्या. या भागात मलवाहिनी तसेच सांडपाणी वाहिनीची कामे आवश्यक असल्याने सध्या सव्वा कोटी रुपयांचा खर्च येथे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.