पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शुक्रवारी पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. ललितचा भाऊ भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांच्या पोलीस कोठडीत २९ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ललितसह साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. ललितसह आठ साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले.
हेही वाचा : अंतरवाली सराटीतील गोळीबारानंतर तुषार दोशी यांची ‘सीआयडी’त झालेली बदली रद्द; आता ‘या’ ठिकाणी झाली नेमणूक
अमली पदार्थनिर्मिती, विक्री, वितरणात ललितसह साथीदार अरविंद लोहरे मुख्य सूत्रधार आहेत. अमली पदार्थ तस्करीत आणखी काही जण सामील आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील ॲड. विलास पटारे यांनी युक्तिवादात केली. पोलिसांनी कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात सादर केलेले मुद्दे नवीन नाहीत. आरोपींना त्रास देण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करत असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
हेही वाचा : पार्थ पवार राजकारणात सक्रिय
आरोपींचे तपासात असहकार्य
अमली पदार्थ तस्करीतील आरोपी हरीश पंत, अरविंद लोहरे, इब्राहिम शेख यांच्या मोबाइल संपर्काचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. विश्लेषणातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी तपासात असहकार्य करत असल्याने त्यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. आरोपींच्या बँक खात्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बँक व्यवहारांची चौकशी करायची आहे. आरोपी इब्राहिम शेख नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.