पुणे : व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या रुग्णवाहिकेवर एकाने दारुच्या नशेत गोळीबार केला. नगर रस्त्यावरील बकोरी परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. वाघोली पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. विशाल रामदास कोलते (वय ३२, रा. बकोरी, ता. हवेली), संदीप कैलास हरगुडे (वय ४२), अमोल राजाराम हरगुडे (वय ३६, दोघे रा. केसनंद, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरेपी संदीप हरगुडेला दारुचे व्यसन आहे. त्याची दारू सोडविण्यासाठी कुटुंबीयांनी लोणी काळभोर भागातील व्यसनमुक्ती दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास संदीप हरगुडे, त्याचे मित्र विशाल कोलते, अमोल हरगुडे बकोरी रस्त्यावरील एका बारमध्ये दारू प्यायला गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : निर्यात वाढविण्यासाठी राज्य सरकारचं पाऊल! थेट उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद

संदीपला नेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णवाहिका आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर विशालने त्याच्याकडील पिस्तुलातून रुग्णवाहिकेवर गोळीबार केला. रुग्णवाहिकेच्या काचा फोडून दहशत माजविली. रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो बचावला. या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरेपी विशाल, संदीप, अमोल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाचा प्रयत्न, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune drunkard fired on ambulance on nagar road also threatened to employees of de addiction center pune print news rbk 25 css