पुणे : शहरात बांधकाम क्षेत्रासाठी मालवाहतूक करणारी (डंपर) दीड हजारांहून अधिक, तर बांधकामापूर्वी कच्चा माल तयार करणारी (मिक्सर) २०० वाहने आहेत. एकीकडे या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली, तरी दुसरीकडे कुशल वाहनचालकांची उणीव आहे. नियमावलीनुसार रात्रपाळीत ही वाहने महामार्गावरून प्रवास करत असली, तरी वाहतूक कोंडी, अपघात अशा घटना घडत आहेत. या घटनांना आवर घालण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील सर्व चालकांची कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघोली येथील डंपरचालकाने बेधुंद अवस्थेत वाहन चालवून आठ जणांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातानंतर चालकाबरोबर डंपरच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूूमीवर मालवाहतूक करणाऱ्या खाण आणि आणि क्रशर उद्योग संघटनांनी चालकांची भूमिका मांडली आहे.

हेही वाचा : ‘ग्रासलँड सफारी’द्वारे पुणेकरांना वन्यजीवांचे दर्शन, वनविभागाच्या उत्पन्नात भर

याबाबत पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे सचिव योगेश ससाणे म्हणाले, ‘वाहतूक पोलिसांच्या नियमावलीनुसार डंपर चालकांना वाघोली, चंदननगर, लोणीकंद, केसनंद फाटा या परिसरात सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीस निर्बंध आहेत. त्यामुळे रात्री वाहने रस्त्यावर येतात. असे असले, तरी सर्वच वाहनचालक नियम पाळतात असे नाही. अनेकदा चालक मद्यसेवन करत असतात. मात्र, अशा गोष्टी निदर्शनास येताच संबंधित चालकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एकीकडे डंपरसारख्या वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कुशल आणि प्रशिक्षित वाहनचालकांची संख्या मात्र कमी झाली आहे.’

कार्यशाळेत काय शिकवणार ?

  • मद्य सेवन करणाऱ्या वाहनचालकांबाबत कठोर निर्बंध
  • चालकाला अवजड वाहनांचे पुन्हा एकदा प्रशिक्षण देणार
  • चालकांचे समुपदेशन करण्यात येणार
  • वाहन बंद पडल्यास किंवा वाहतूक कोंडी झाल्यास घेण्यात येणारी काळजी
  • वाहनांची तपासणी, तांत्रिक बाबींची तपासणी

हेही वाचा : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सरसावले !

गौण खनिज किंवा बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमानुसार रात्री वाहतूक करण्यात येत आहे. रात्रीत अपघात होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या चालकांना पुन्हा एकदा प्रशिक्षण, समुपदेशन करण्याचे नियोजन आहे. अशी वाहतूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune dumper and mixer drivers will be given training to avoid road accidents pune print news vvp 08 css