पुणे : वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली ऊस, गवत व कचरा पेटवण्याच्या प्रकारांमुळे गेल्या महिनाभरात पारेषण व वितरण यंत्रणेत ८ ठिकाणी बिघाड झाला, तर तब्बल ७ लाख ६५ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. महावितरणला अशा प्रकारच्या आगींमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महापारेषण व महावितरणच्या वीजवाहिन्या शेतातून, जंगलातून गेलेल्या आहेत. प्रामुख्याने महापारेषणच्या टॉवर लाइन्सखाली (वीजतारांच्या वाहिन्या) गेल्या २३ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत गवत, ऊस व जंगलातील वणवासदृश आगीचे पाच प्रकार घडले. त्यामुळे प्रामुख्याने चाकण, भोसरी व हिंजवडी फेज १ ते ३ मधील सर्व लहान-मोठे उद्योग तसेच पिंपरी-चिंचवड शहर, वाकड, भोसरी गाव आदींसह मुळशी तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे ५ लाख ९६ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना दोन ते तीन वेळा प्रत्येकी ४५ ते ६० मिनिटे खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले. आंबेगाव बुद्रुक येथील ओढ्याजवळ टाकलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने महावितरणच्या ‘अमित उपकेंद्रा’ला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी जळाली. परिणामी, २७ हजार वीजग्राहकांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार

महावितरणच्या माहितीनुसार, आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर असलेल्या ओढ्यात चरांमध्ये फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. या आगीत महावितरणच्या ८ वीजवाहिन्या जळून खाक झाल्या. मंगळवारी, १५ एप्रिलला पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे पाच वाजेपर्यंत विस्कळीत झाला. विश्रांतवाडी, कळस परिसरातील सुमारे १० हजार आणि दिघी परिसरातील १७ हजार, अशा २७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बंद होता. मंगळवारी, १५ एप्रिलला वाघोली, केसनंद परिसरात रोहित्रांजवळ कचरा साठवून तो जाळण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे केबल जळाल्याने स्थानिक परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले.

‘अनेक ठिकाणी वीजयंत्रणेच्या आसपास कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे आढळते. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घूस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये, जाळू नये. असे प्रकार घडताना दिसल्यास ‘महावितरण’च्या यंत्रणेला लवकरात लवकर कळवावे,’ असे आवाहन ‘महावितरण’चे पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.

अशी नोंदवा तक्रार

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजवाहिन्यांच्या खाली तसेच रोहित्र, फिडर पिलर व इतर वीजयंत्रणेजवळ ओला व सुका कचरा टाकू नये. साठवलेला कचरा जाळू नये. कचरा, वाढलेले तण, गवत, उसाच्या आगीमुळे प्रामुख्याने वीजवाहिन्यांमध्ये ट्रिपिंग आल्याने वीजपुरवठा खंडित होतो. वीजयंत्रणेला जवळच्या आगीमुळे धोका असल्याचे लक्षात येताच २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

आग लागून वीज यंत्रणेचे आणि पर्यायाने ग्राहकांचे नुकसान होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, सीमाभिंती बांधण्यात आल्या आहेत.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे विभाग, महावितरण