पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीत मतदान करता येण्यासाठी पात्र नागरिकांना १६ ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करावी लागणार आहे.

आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आणि निगडी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात मतदार नोंदणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी आणि मतदानाचे महत्त्व समजावून देण्यात आले. चिंचवड येथील नागनाथ मारुती गडसिंग (गुरुजी) कनिष्ठ महाविद्यालयातही विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच भोर, सासवड, विश्रांतवाडी येथील पंचशील नगर, टिंगरे नगर, मगरपट्टा, थेरगाव, वेल्हे, मुळशी, आंबेगाव, खेड, आळंदी, मुळशी, आंबेगाव, चांडोली खुर्द, अवसारी खुर्द, भोसरी आदी विविध ठिकाणी मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात आले.

हेही वाचा : पुणे ग्रामीण पोलीसांत ४४८ जागांसाठी भरती, मैदानी चाचणीसाठीचे नवीन वेळापत्रक जाहीर

मतदारांना विशेष मोहिमेची माहिती देण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध जनजागृती उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. विशेषत: नवमतदारांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. मतदार नोंदणीसोबत मतदार यादीतील तपशिलात दुरूस्तीचे अर्ज शिबिरात स्वीकारण्यात येत आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास किंवा तपशीलात बदल करायचा असल्यास नागरिकांनी या विशेष शिबिरात सहभाग घ्यावा किंवा जवळच्या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.