पुणे : पुणे शहरातील पूर्व भागात भीक मागणाऱ्यांचे पुनर्वसन आणि सुधारगृहासाठी राज्य सरकारने जागा राखीव ठेवली आहे. मात्र, या जागेवर अतिक्रमण होऊन बेकायदा धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. या धार्मिक स्थळांबाहेरच आपल्यासाठी राखीव असलेल्या जागी भिक्षेकरी भीक मागत असल्याचे भीषण वास्तव विधिमंडळात समोर आले आहे.
हेही वाचा : सरकारचं तुमच्या आरोग्यावर लक्ष! आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त पुरुषांची तपासणी
पुणे शहरात भिक्षेकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमणे झाल्याबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ‘हडपसर येथे भिक्षेकरी पुनर्वसनासाठी आणि सुधारगृहासाठी महिला व बालविकास आयुक्त यांच्या नावाने शासकीय मालकीची जागा आहे, ही बाब खरी आहे. भिक्षेकरी प्रयोजनासाठी राखीव असलेल्या या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत, हे देखील खरे आहे. या जागेची १७ सप्टेंबर २०२० रोजी भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करण्यात आली. या जागेवर काही लोकांनी ४९ धार्मिक स्थळे (मंदिरे) आणि समाजमंदिरे बांधलेली आहेत. या मंदिरांच्या भोवती संरक्षक भिंतीही बांधून जागा हडप करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पुणे यांच्यामार्फत वानवडी पोलीस ठाण्यात ७ एप्रिल २०२१ रोजी एफआयआर क्र. ०११७ अन्वये संबंधित अतिक्रमण धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अतिक्रमण काढण्यासाठी विभागामार्फत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.’