पुणे : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियात हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभियंता महिलेच्या ३६ वर्षीय पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डाॅ. प्रशांत यादव (रा. गुरुग्राम, हरियाणा), डॉ. स्वप्नील नागे (रा. नऱ्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची पत्नी खराडी येथील एका कंपनीत अभियंता (क्वालिटी इंजिनियर) काम करत होती. त्यांचे वजन जास्त असल्याने त्यांनी वजन कमी करण्याबाबतची माहिती घेतली होती. त्यावेळी त्यांना एरंडवणे भागातील डिझायर क्लिनिकची माहिती मिळाली. त्यानंतर अभियंता महिलेने संबंधित रुग्णालयाच्या क्रमांकावर संपर्क साधला आणि वजन कमी करण्याबाबतच्या उपचारपद्धतींची माहिती घेतली. त्यावेळी रुग्णालयातील स्वागतकक्षातील कर्मचाऱ्यांनी लिपोसक्शन शस्त्रक्रिया वजन कमी करण्यासाठी केली जात असल्याचे सांगितले.
हेही वाचा : साहित्य संमेलनाचे स्थळ ठरले! तब्बल सत्तर वर्षांनी मिळणार मान!
त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२२ रोजी अभियंता महिलेवर लिपोसक्शन शस्त्रक्रिया करून साडेचार लिटर मेद (फॅट) काढण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अभियंता महिला अत्यवस्थ झाल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करताना भूल दिल्यानंतर पल्स रेट, रक्तदाब कमी झाला, तसेच प्राणवायुचा मेंदूला पुरवठा न झाल्याने मेंदूला इजा पोहचली. खासगी रुग्णालयात अभियंता महिला तीन महिने उपचार घेत होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी नेण्यात आले. तेव्हापासून पत्नी अंथरुणाला खिळून असून, ती बोलत नाही. ती फक्त डोळे उघडझाप करत असल्याचे पतीने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd