पुणे : पश्चिम घाटातील दगडखाणींच्या खोदकामाचा पर्जन्यमानावर विपरित परिणाम होत आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. माधव गाडगी‌ळ यांनी शनिवारी व्यक्त केले. जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय न्यायासाठी राष्ट्रीय आघाडीने पुण्यात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात गाडगीळ बोलत होते. पर्यावरणतज्ज्ञ प्रा. सौम्या दत्ता, विजय परांजपे, प्रफुल्ल सामंतरा, सुनीती सु. र., संतोष ललवाणी या वेळी उपस्थित होते. मेधा पाटकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडगीळ म्हणाले, ‘सध्या दगडखाणीचे पेव फुटले आहे. डोंगर खोदून दगड काढले जात आहेत. त्यामुळे अनेक भागात दरड कोसळतात. केरळमध्ये दरड कोसळून चारशेहून अधिक माणसे मेली. त्यानंतर अनेकजण जागे झाले. मी तिथे पूर्वी काम केले आहे. वायनाडमध्ये चहाचे खूप मळे आहेत. सपाट जमिनीवर लोक राहतात. जिथे माणसांनी राहणे योग्य नाही. तिथे मजुरांना राहायला सांगितले जाते. मग दरड कोसळून हे मजूर मृत्युमुखी पडतात. हेच सर्वत्र दिसत असून आजही अनेकांचे पुनर्वसन झालेले नाही. खरेतर पुनर्वसन कधीच होत नाही. कोयना धरणाच्या वेळी १९५६ मध्ये जे विस्थापित झाले, त्यांना आजही घरे मिळाली नाहीत. पश्चिम घाटात व्याघ्र प्रकल्प झाला. त्या ठिकाणी वन विभाग तेथील लोकांना हाकलून लावतात. खरेतर इतिहासात कुठेही खूप दरड कोसळल्याच्या नोंदी नाहीत, मग आता हे का होत आहे? आपल्याकडे माळीणला असाच प्रकार घडला होता. यावर उपाय करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :रेल्वेचा गर्दी टाळण्यासाठी पुण्यासह मुंबई अन् इतर ठिकाणी मोठा निर्णय

गाडगीळ म्हणाले, ‘वातावरणावर ‘एरोसेल’ म्हणजे सूक्ष्म कणांचा स्तर असतो. संशोधनाअंती भारतावर असे ‘एरोसेल’ सर्वात जास्त आहेत. दगडखाणीतील यंत्रांमध्ये दगड चिरडले जातात आणि त्यांची पूड होते. ते बारीक कण वातावरणात जातात. तसेच, वाहनांमधून जो धूर निघतो, त्यातही सूक्ष्म कण असतात. जेव्हा समुद्राचे तापमान वाढते, तेव्हा बाष्प वरती जाऊन या कणांवर बसते आणि अधिक बाष्प वर गेली की, कणांभोवती बाष्पाचा मोठा गोळा होतो. मग ते अचानक खाली आल्यानंतर कमी वेळेत अधिक पाऊस होतो. नदीला पूर येतो.

हेही वाचा : पिंपरी : आचारसंहिता संपताच पीएमआरडीए ॲक्शन मोडवर; अनधिकृत बांधकाम धारकांवर थेट..

पर्यावरणासंदर्भात काम करताना आपल्याला अर्बन नक्षली, देशद्रोही म्हटले जाईल. पण, आपण घातक प्रकल्पावर बोलले पाहिजे. माहिती अधिकाराचा कायदा वापरून लढा दिला पाहिजे. नद्यांची अवस्था वाईट आहे. नद्यांवर अतिक्रमण होत आहे. नदीवर प्रकल्प केला जातो. त्याने नदीची अवस्था आणखी वाईट होईल. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष देत नाही. विकासाची अवधाने बदलली पाहिजेत.

मेधा पाटकर, नेत्या, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune environmentalist dr madhav gadgil said adverse effect of excavation of stone quarries on rainfall pune print news vvk 10 css