पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक, तसेच कराडमधील यशवंत सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी याबाबतचे आदेश दिले. शेखर सुरेश चरेगांवकर यांच्यासह बुलढाणा येथील चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता यांच्यासह साथीदारांनी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) स्थापन विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चरेगावकर यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध ५ मार्च रोजी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी तक्रारदारांना गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
हेही वाचा : कसबा पेठेत प्रशासनाची कारवाई, केले ‘इतके’ रुपये जप्त!
या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे सोपविण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी शेखर चरेगांवकर आणि रोहित लभडे यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. विशेष सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर आणि तक्रारदारांचे वकील ॲड. विपुल दुशिंग, ॲड. स्वानंद गोविंदवार अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला. ॲड. रोहित राहिंज आणि ॲड. अभिनव नलावडे यांनी सहाय केले. संबंधित गुन्हागंभीर स्वरुपाचा आहे. लेखापरीक्षणातून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदारांच्या कर्जखात्यातील रकमेचा विनियोग आरोपींनी स्वत:साठी केला आहे. अनेक कर्जदारांना फसविले आहे, असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.