पुणे : क्वीन्स गार्डन भागातील एका संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत कार्यालयीन कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या समाजमाध्यमातील समूहात आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित संस्थेतील कनिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
संजीव कटके (रा. क्वीन्स गार्डन, कोरेगाव पार्क) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला अधिकाऱ्याने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला २०२२ पासून कंत्राटी पद्धतीने संबंधित संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. या संस्थेतील एका विभागात संजीव कटके सहायक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतात. १३ जून रोजी पीडित महिला काम करत होती. अधिछात्रवृत्तीबाबत माहिती अधिकारी अधिनियम २००५ अंतर्गत एक अपील दाखल झाले होते. अपिलातील महत्त्वाचे पत्र मिळाले होते.
हेही वाचा : सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार अन् सुप्रिया सुळेंची भेट
संबंधित पत्रातील विषय कटके यांच्या विभागाशी संबंधित होता. त्यामुळे महिलेने कार्यालयीन सहायकामार्फत कटके यांना बोलाविले. त्यावेळी कटके कार्यालयात नव्हते. त्यानंतर कटके यांनी महिलेशी संपर्क साधला. मी एके ठिकाणी अंत्यविधीला आलो असल्याचे कटके यांनी सांगितले. त्यावेळी महिलेने त्यांना प्रशासकीय पत्राबाबत कल्पना दिली. कार्यालयातून बाहेर पडताना किमान दूरध्वनी करायचा होता किंवा संदेश पाठवायचा होता, असे महिलेने त्यांना सांगितले.
कटके कोणतीही नोंद न करता कार्यालायतून बाहेर पडले होते. विभाग प्रमुख आणि प्रकल्प व्यवस्थापकांची पूर्वपरवानगी त्यांनी घेतली नव्हती. त्यानंतर कटके यांनी सायंकाळी अंत्यविधीची चित्रफीत कार्यालयीन कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या समूहावर टाकली. संशाेधन संस्थेतील महासंचालकांच्या नावे एक संदेश पाठविला. तक्रारदार महिला कोठे सांगून जातात, असा संदेश त्यांनी समूहावर प्रसारित केला. त्यानंतर महिला १४ जून रोजी कार्यालयात आल्या. तेव्हा समाजमाध्यमातील समूहावर चित्रफीत तसेच दूरध्वनी संदेश का प्रसारित केला, अशी विचारणा केली. प्रशासकीय पत्राबाबत माहिती घेण्यासाठी दूरध्वनी केला असल्याचे महिलेने त्यांना सांगितले.
हेही वाचा : Pooja Khedkar : “अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणं शक्य नाही”, पूजा खेडकर यांची मागणी रुग्णालयाने फेटाळली होती!
त्यानंतर कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण कार्यालयीन कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या समूहावर प्रसारित करणार असल्याचे कटके यांनी सांगितले. तुम्ही काय करता ? कोठे जाता?, याबाबतची माहिती देणार असल्याचे कटके यांनी सांगितले. त्यामुळे महिलेने कटके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तक्रारदार महिला आणि अन्य महिला सहकाऱ्यांनी संशोधन संस्थेतील महासंचालक, तसेच अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज दिला. कटके नेहमी अपमानास्पद वागणूक देतात. आपल्यावर पाळत ठेवतात, असे महिलेने तक्रारीत नमूद केले. कटके यांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला असल्याचे महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे.