पुणे : गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून संबंधित पब पहाटे पाचपर्यंत सुरू असल्याचेही उघडकीस आले. याप्रकरणी पबमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पबमालकासह चालकांना ताब्यात घेतले असून, रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिले. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणीनगरसह शहरातील विविध भागांत असलेल्या पबवर कारवाईचा बडगा उगारला. बेकायदा बांधकामे, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मात्र, अशातच फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्येच पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत रविवारी प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची चाैकशी करून कारवाईचे आदेश दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील हाॅटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचे ड्रग्स सेवन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मध्यरात्रीनंतर फर्ग्युसन रस्त्यावरील पब सुरू असल्याने कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्वीड लीजर लाऊंज पब, बार पहाटे उशीरपर्यंत सुरू असल्याचे, तसेच तेथे अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पब, बार चालक, मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले, पोलिसांनी पब लाखबंद (सील) केला. संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र गिराफे, उत्कर्ष देशमाने अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशीरा अटक करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ferguson college road drug consumption case three police officers of shivajinagar police station suspended pune print news rbk 25 css