पुणे : शहरात अनेक इमारती, जुन्या वाड्यांमध्ये लहान मोठ्या अभ्यासिका सुरू आहेत. दिल्ली येथे अभ्यासिकेत पाणी घुसल्याने अनेक होतकरू तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंंतर शहरातील अभ्यासिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून प्रत्येक अभ्यासिकेचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबत महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

गांजवे चौक परिसरातील अभ्यासिकेला आग लागून अभ्यासिकेतील लॅपटॉप, पुस्तके, खुर्च्या आदी साहित्य जळून खाक झाले. या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन अभ्यासिकांच्या अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

हे ही वाचा…मतदार संघाची पुनर्रचना आणि यशाची हमी

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. विद्यार्थी राज्यातील विविध ठिकाणाहून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. त्यांना सुरक्षित वातावरणात अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शहरात सुरू असलेल्या अभ्यासिकांच्या माध्यमातून अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेच्या तुलनेत त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या तुटपुंज्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अभ्यासिकेचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे, असे यादव यांनी नमूद केले. तसेच महापालिका प्रशासनाने येत्या आठवड्यात शहरातील सर्व अभ्यासिकांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण न केल्यास न केल्यास, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अभ्यासिका चालकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.