पिंपरी : महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोला मंगळवारी आग लागली. आगीची वर्दी कळताच अग्निशमन दलाच्या चार बंबाच्या सहाय्याने आणि माती टाकून आग विझवण्याचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू हाेते. तापमानात वाढ झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोशी येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. शहरातील घरोघरचा कचरा संकलन करून मोशीत टाकला जातो. कचरा डेपोतील ‘सॅनिटरी लॅन्डफिलवर’ आग लागली. तापमान वाढल्याने कचऱ्याच्या ढिगाखाली मिथेल वायुची निर्मिती होते. त्यामुळेच आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, तापमान वाढू लागले आहे. तापमान वाढल्याने कचऱ्याच्या ढिगाखाली मिथेल वायुची निर्मिती होते. हवेचा दाब निर्माण झाल्याने ज्वलनशील वायूचे उत्सर्जन होऊन आगीची घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाणी आणि माती टाकून आग विझवण्यात येत आहे.
यापूर्वी २०२२ मध्ये कचरा डेपोला दोनदा आग
मोशीतील कचरा डेपोला ६ आणि १७ एप्रिल २०२२ रोजी आग लागली होती. ती आग अनेक तास धुमसत होती. त्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी मोशी कचरा डेपोची पाहणी करून चौकशी समिती नेमली होती. तसेच संबंधित ठेकेदाराला तीन लाखांचा दंडही ठोठावला होता.