पुणे : हडपसर भागातील मांजरीत ध्नवीवर्धक यंत्रणा तयार करणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी पहाटे आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. आगीत कारखान्यातील साहित्य भस्मसात झाले. आगीमागचे कारण समजू शकले नाही. हडपसर भागातील मांजरी परिसरातील कारखान्यात ध्वनीवर्धक यंत्रणा तयार केली जाते. तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती या भागातील रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत ध्वनीवर्धक यंत्रणा तयार करण्यासाठी लागणारे लाकडी खोकी, इलेक्ट्राॅनिक साहित्य, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. जवानांनी पाण्यााचा मारा करुन अर्ध्या ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आल्यानंतर लाकडी साहित्य धूमसत होते.

जवानांनी कारखान्यात प्रवेश केला. आगीत कोणी अडकले का नाही, याची खात्री करण्यात आली. आगीत संपुर्ण कारखाना जळाला, तसेच आगीत सीएनसी मशीन, कटींग मशीन, ध्वनीवर्धक, एम्लिफायर्स, प्लायवुड, रंगाचे डबे, फायबर साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग असे साहित्य जळाले. या आगीचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader