पुणे : गणेशोत्सवात यंदा प्रथमच पुणे अग्निशमन दल आणि फायर अँन्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसएआय) यांच्या वतीने ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात मंडपाच्या परिसरात आग लागणे, तसेच एखादी दुर्घटना घडल्यास भाविकांची सुरक्षेला प्राधान्य देण्याबाबत जागरुकता निर्माण करणे, या विचाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. राज्यासह परराज्यातून भाविक उत्सवाच्या कालावधीत शहरात येतात. मंडपाच्या परिसरात आग लागणे, तसेच एखादी दुर्घटना घडल्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने (गुगल फाॅर्म) अर्ज करावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.
हेही वाचा : Monsoon Update: राज्यात आजपासून चार दिवस जोरधारांचा अंदाज
मंडळांनी नोंदणी करताना दिलेल्या अर्जामध्ये माहिती भरुन दिल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाकडील अग्निशमन अधिकारी आणि एफएसएआय संस्थेचे सदस्य मंडळांना भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक असे बक्षीस जाहीर केले जाईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.