पुणे : खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने मुठा नदीपात्रात शनिवारी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. शिवणे येथील दांगट पाटील इस्टेट परिसरात नदीपात्रात अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर सुटका केली. नदीपात्रात दोघेजण अडकल्याने धरणातून काही वेळ विसर्ग कमी करण्यात आला होता.
शिवणे परिसरात मुठा नदीपात्रात एक छोटे बेट आहे. खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाावर पाणी सोडण्यात आले. बेटावर दोघे अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पाण्याचा वेग आणि खडकाळ भागामुळे मदतकार्यात अडथळे आहे. छोट्या नावेतून जवान बेटापर्यंत पोहोचले. बेटावर अडकलेल्या दोघांना जवानांनी धीर दिला. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पाेटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी दोघांची सुखरुप सुटका केली. जलसंपदा विभाग, महापालिका आपत्ती कक्ष, पोलीस, तसेच स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात सहाय केले.