पुणे : कामावर निघालेल्या अग्निशमन दलातील जवान मंदार नलावडे यांनी पद्मावती चौकात पेटलेल्या दुचाकीची आग आटोक्यात आणली. नलावडे यांच्या तत्परतेचे कौतूक करण्यात आले. अग्निशमन दलातील जवान मंदार नलावडे गंगाधाम येथील अग्निशमन केंद्रात नियुक्तीस आहेत.
हेही वाचा : पुणे: गादी कारखान्यातील यंत्रात अडकून कामगाराचा मृत्यू, दुर्घटनेत एक कामगार जखमी; यंत्रचालकाविरुद्ध गुन्हा
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ते कामावर निघाले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावाती चौकात एका इलेक्ट्रीक दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वाराने आरडाओरडा केला. तेथून निघालेल्या दुचाकीस्वार नलावडे यांनी पेटलेली दुचाकी पाहिली. त्यांनी त्वरीत तेथे धाव घेतली आणि शेजारी असलेल्या इराणी कॅफे या उपहारृहातून अग्निरोधक यंत्र आणले. उपकरणाचा वापर करून नलावडे यांनी दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणली. नलावडे यांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने दुचाकीस्वार आणि नागरिकांनी त्यांचे आभार मानले. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी नलावडे यांचे कौतूक केले.
© The Indian Express (P) Ltd