पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतण्या प्रथमच रविवारी दौंड येथील कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले. मात्र, शेजारी न बसल्याने त्यांच्यातील दुरावा कायम असल्याचे दिसून आले. विद्या प्रतिष्ठानच्या दौंड येथील अनंतराव पवार शाळेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला पवार कुटुंबाने उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदा एकाच मंचावर आले होते. त्यामुळे त्यांच्यात काही संवाद होतो का, हे पाहण्याची उत्सुकता होती. त्यांच्यामध्ये संवाद तर झाला नाहीच; पण अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून दुरावा ठेवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांच्याशेजारी असलेल्या खुर्चीवरील नावाची पाटी अजित पवार यांनी काढली आणि ते दोन खुर्ची सोडून बसल्याचे सर्वांना पाहायला मिळाले.

हेही वाचा : VIDEO: पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही संवाद होईल अशी अपेक्षा होती. पण, तब्बल दीड तासाच्या कार्यक्रमादरम्यान या दोघांमध्ये कुठलीही चर्चा किंवा संवाद झाला नाही. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोघी कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्या होत्या. या वेळी नणंद-भावजय यांच्याकडून एकत्र छायाचित्र काढून घेण्यात आले.

हेही वाचा : पुणे: मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेत चंदन चोरी

कार्यक्रम सुरू होताना शरद पवार व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी अजित पवार त्यांच्याजवळ जाऊन उभे राहिले. पण, त्यांच्यामध्ये कोणताही संवाद झाला नाही. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार लगेच तेथून निघाले. त्यामुळे काका-पुतण्यामध्ये कडवटपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune first time ajit pawar sharad pawar supriya sule on same stage after split in the ncp ajit pawar keeps distance from sharad pawar pune print news vvk 10 css