पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) हिंजवडी, चऱ्होली, भोसरी, मोशी आणि रावेत या ठिकाणी नवीन आगार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भोसरी, रावेत आणि मोशी येथील साडेपाच एकर जागा पीएमपीने भाडेतत्त्वावर घेतली आहे. नवीन पाच आगारांमुळे पीएमपीच्या आगारांची संख्या आता २० होणार आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत सार्वजनिक वाहतूक सुविधा आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीएने भोसरी, रावेत आणि मोशी येथील साडेपाच एकर जागा पीएमपीला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्याबाबतचा करार करण्यात आला आहे. नवीन आगारांमुळे पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी सांगितले.
नार्वेकर म्हणाले, ‘पीएमपी प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तिन्ही जागांवर नवीन आगार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रावेत येथे सीएनजीचे आगार, तर मोशी व भोसरी येथे इलेक्ट्रिक बससाठी ई-आगार उभारण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त बस एकाच ठिकाणी उभ्या राहतील, यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. हिंजवडी आणि चऱ्होली येथे पीएमपीच्या मालकीची जागा असून, त्या ठिकाणी आगार उभारण्यात येणार आहेत.’