पुणे : पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे. ताप, सर्दी, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहेत. याचबरोबर लहान मुलांना डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
लहान मुलांमध्ये फ्लूची साथ दिसून येत आहे. अचानक ताप, सर्दी, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहेत. पावसाळ्यात लहान मुलांना फ्लूचा संसर्ग होतो. याचबरोबर लहान मुलांना डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. लहान मुलांमध्ये ताप आणि अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसून आल्यास पालकांनी तातडीने त्यांना नजीकच्या डॉक्टरांकडे न्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावेत. सध्या साथरोगांचा प्रसार वेगाने सुरू असल्याने मूल आजारी पडल्यास त्याला शाळेत पाठवू नये. कारण त्याचा इतर मुलांना संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा यांनी दिली.
प्रौढ व्यक्तींमध्ये डेंग्यूची लक्षणे सौम्य असतात. अनेकदा प्रौढ व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. इतर कोणत्याही वयोगटातील व्यक्तींपेक्षा नवजात बालकांसाठी डेंग्यू सर्वात जास्त धोकादायक ठरतो. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांमध्ये डेंग्यूमुळे डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊन प्रकृतीची गंभीर गुंतागुंत होण्याची खूप जास्त शक्यता असते. यामध्ये खूप जास्त रक्तस्त्राव आणि अवयवांचे नुकसान होऊ शकते. त्याला तातडीने वैद्यकीय उपचार व देखभालीची गरज असते, असे सूर्या हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत खंदारे यांनी सांगितले.
हेही वाचा : पिंपरी : ‘पशुसंवर्धन’ची १३ एकर जागा पिंपरी महापालिकेकडे; ‘या’ नागरी सुविधा होणार
लहान मुलांना पावसाळ्यात फ्लूचा संसर्ग होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांना दरवर्षी इन्फ्लूएन्झाची लस देणे गरजेचे आहे. यातून लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यांना फ्लूचा संसर्ग होणार नाही.
डॉ. दिलीप सारडा, बालरोगतज्ज्ञ