पुणे : औंध भागातील एका घरामध्ये छोट्या पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या तीन पोपटांची (अलेक्झांड्रिन पॅराकीट) सुटका करून वन विभागाने संबंधित नागरिकावर कायदेशीर कारवाई केली आहे. ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स इंडिया’ (पेटा) आणि वन विभागातर्फे संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. सुटका केलेल्या पोपटांना वैद्यकीय उपचार केंद्रात ठेवण्यात आले असून, संबंधित नागरिकावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंधमध्ये एका निवासस्थानी छोट्या, मळकट पिंजऱ्यात पोपटांना डांबून ठेवल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पेटाकडे आली होती. याप्रकरणी संस्थेने वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या सहभागातून संबंधित निवासस्थानी भेट दिली. बचाव पथकाला तीन पोपट वाईट अवस्थेत सापडले. ताब्यात घेतलेल्या पोपटांना बावधन येथील वन विभाग आणि रेस्क्यू ट्रस्टच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना निसर्गात सोडण्यात येईल, अशी माहिती पेटाच्या समन्वयक सुनयना बासू यांनी दिली.

हेही वाचा…‘नीट-पीजी’च्या तारखेची प्रतीक्षा तर संपली, आता आव्हान परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे…

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार पोपटांचा संरक्षित वन्यप्राण्यांमध्ये समावेश होतो. त्यांची खरेदी, विक्री करणे, त्यांना स्वतः जवळ ठेवणे हा गुन्हा आहे. त्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. औंध प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पेटाने केली होती. त्यानुसार वन विभागाकडून संबंधित नागरिकावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.