पुणे : पहाडी पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना वन विभागाने कोथरुड भागात पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले आहेत. पियूष दत्तात्रय पासलकर (वय २१, रा. कर्वेनगर),यश रमेश कानगुडे (वय २१), सौरभ कोडिंबा झोरे (वय १९, दोघे रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात पासलकर, कानगुडे, झोरे पहाडी पोपट (ॲलेक्झांड्रियन) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला रविवारी मिळाली.
त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ, वनरक्षक डाके आणि पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी साताऱ्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सहकार्य केले.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’
पहाडी पोपट बाळगणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत प्रतिबंधित आहे. पहाडी पोपट बाळगणे, विक्री, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे.