पुणे : फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन दुचाकीवरील चौघे जण गंभीर झाले. वेळीच उपचारासाठी दाखल केल्याने चौघांचे प्राण वाचले. उरळी कांचन भागातील आश्रम रस्त्यावर शनिवारी सायंकाळी अपघात झाला.

चक्रधर संतोष कांचन, क्षितीज राहुल जाधव, सिद्धांत नवनाथ सातव, प्रतीक संतोष साठे अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. अपघातात सिद्धांत सातव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उरळी कांचन पोलिसांनी दिली. चक्रधर, क्षितीज, सिद्धांत, प्रतीक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितीज शनिवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास बुलेटवरुन उरळी कांचन परिसरातील आश्रम रस्त्याने निघाला होता. त्याच्याबरोबर मित्र चक्रधर होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती. त्यावेळी समोरुन दुचाकीस्वार सिद्धांत आणि त्याचा मित्र प्रतीक उरळी कांचनकडे निघाले होते. आश्रम रस्त्यावर एका दुकानाचे उद्घाटन होते. उद्घाटनानिमित्त मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आल्याने धूर झाला. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीवर बुलेट आदळली. अपघातात चौघेै जण जखमी झाले. बुलेटची धडक एवढी जोरात होती की चौघे जण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

हेही वाचा: पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?

अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने चौघांचे प्राण वाचले, असे पोलिसांनी सांगितले.